Wednesday, 18 March 2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 


युगादी

सहा ऋतूंच्या प्रवासातली, नवी पहाट येऊ म्हणतेय

गळती नंतर, फांदीला ही, नवी पालवी फुटू म्हणतेय

 

अस्तानंतर पडले असतील, आयुष्याला किती प्रश्न ?

गतवर्ष्याच्या प्रवासातले, छळत असतील काही विघ्न ?

विघ्नालाही तोड धीराची, प्रश्नाला हि मिळती उत्तर

पूर्ण होतील सारी व्रते, मग विघ्न असू दे सतरा सत्तर

बुरे बुरे ते भले जाणुनी, संसारगाडा चालवू म्हणतेय ...

गळती नंतर फांदीला ही, नवी पालवी फुटू म्हणतेय ...

 

सडा रांगोळी, दीप दिवाळी, आनंदाचे ओले अंगण

फुल पाखरे चिमण्या येउनी, पिंगा घालुनी करती रंजन

गुढी होऊनी लक्ष्मी यावी, सरस्वती असावी सोबतीला

प्रसन्न व्हावी धन्वन्तरीही, लाभो निरामय आयुष्याला

निर्व्यसनी, निगर्वाचे, नवखे कपाट सजवू म्हणतेय ...

सहा ऋतूंच्या प्रवासातली, नवी पहाट येऊ म्हणतेय ...

 

डॉ. प्रविण करंदीकर

18/03/2026


No comments:

Post a Comment